गुरुवार, १० जानेवारी, २०१३

लोलक

'खुपते तिथे गुप्ते' मध्ये सलिल ने एकवलेली 'शांता शेळके' यांची कविता :

देवळाच्या झुम्बरातुन सापडलेला लोलक
हरवला माझ्या हातुन
आणि दिसू लागली पुन्हा
माणसं माणसासारखी
पुन्हा दिसू लागलं
गवत हिरवं आणि
आभाळ दिसू लागलं पुन्हा नीळ…
परवा खूप खूप वर्षांनी
एक चिमुरडी धावत आली माझ्याकडे
आणि म्हणाली,
`आजी तुला माहिती आहे’
गवत नसतं नुसतं हिरवं
आणि आभाळ नसतं नुसतं नीळ
आणि माणसं असतात
इंद्रधनुष्याची बनलेली
माझा लोलक हिला कुठे बरं सापडला?
त्या देवळातल्या झुम्बराला
अजून असे किती लोलक आहेत
कुणास ठाऊक??

खरच किती सुंदर न वास्तव आहे ना , आपण सगळेच तो लोलक हरवून बसलो आहोत अस वाटत. सोंदर्यदृष्टी देणारा लोलक जो जन्माला येताना आपण सगळेच घेऊन आलो होतो, पण धावण्याच्या नादात तो हरवून बसलो, किवा त्याचा वापर विसरलो. 
निखळ सौंदर्य, निरागस प्रेम, प्रामाणिकपणा हे सगळ आजही जगात आहे पण बर्याचदा ते आपल्याला दिसत नाही कारण आपण तो लोलक हरवून बसलोय. अन मग आपण त्या प्रेमात स्वार्थ शोधतो, सौंदर्यात कृत्रिमता शोधतो अन जगण्यातला आनंद गमावून बसतो.
आपल्या सगळ्यां मध्ये ना एक लहान मुल दडलेलं असत, त्याच्या हातात कदाचित हा लोलक असावा. लहान मुलांना नाही का कुठल्या हि गोष्टीचं हसू येत. बर्याचदा आपल्याला प्रश्न पडतो कि यात हसण्या सारख काय आहे, अन मग आपली बुद्धी वापरून निष्कर्ष काढतो कि ते विनाकारण हसतात, पण तसं नसतं त्यांचा लोलक त्यांच्याच कडे असतो अन आपला मात्र हरवला असतो. जग खूप सुंदर आहे पण ते सौंदर्य बघायची दृष्टी मात्र पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: