अजून एक धमाका झाला,
गरिबांची घरे उध्वस्त झाली,
गर्दीतली चेहरे नसलेली माणसे मेली,
मंदिर-मस्जिद पुन्हा दुभंगली
अजून एक धमाका झाला,
कुणाचा तरी एकुलता एक पोर गेला,
कुण्या नवं-विवाहितेने आपला सिंदूर गमावला,
खाऊ आणणाऱ्या बाबाची वाट पाहणारा लेक पोरका झाला
अजून एक धमाका झाला,
मिडिया ला मोठा trp असलेली ब्रेंकिंग न्यूज मिळाली,
पहिली बातमी पहिल्या फोटोची जीवघेणी स्पर्धा सुरु झाली,
टीव्हीवर झळकणार म्हणून बाईट घेणारी पोरगी नटली
अजून एक धमाका झाला,
सुतकी चेहरा करून नेते मंडळी माईकपाशी गोळा झाली,
मृताना २ लाख अन जखमींना ५० हजाराची भेट जाहीर झाली,
स्वच्छ कपडे जपत पीडितांच्या दु:खात सामील झाली
अजून एक धमाका झाला,
सरकारच्या हलगर्जीपणाची विरोधी पक्षाने आवई उठवली,
तर यात परकीय शक्तींचा हात असल्याची सरकारला उपरती झाली,
दोघांच्या या भांडणात अफझल कसाब सारख्यांची मात्र चंगळ झाली
अजून एक धमाका झाला,
दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच सूर्य उगवला,
काल काही झालंच नाही या अविर्भावात मुंबई धाऊ लागली,
तिच्या या निर्भीडपणाच कौतुक करणाऱ्यांची रांग लागली
अजून एक धमाका झाला,
कोपऱ्यात जखमी अवस्थेत पडेलेल्या स्त्री कडे कुणाचे लक्षच नव्हते,
अंगाखांद्यांवर झालेल्या असंख्य घावांनी ती घायाळ होती,
ती कदाचित भारतमाता असावी ...
- विशाल पाठक
- विशाल पाठक