बुधवार, २८ एप्रिल, २०१०

मधुरा

घरी माझ्या आली एक सुंदर परी
स्वप्न नाही, गोष्ट मी सांगतोय खरी |

इवले इवले हात तिचे , इवले इवले पाय
टपोरे डोळे कळेना शोधतात काय |

गोरे गोरे गाल तिचे लाल चुटुक ओठ
चोखत असते हातात धरून पायाच बोट |

कुणी म्हणत तिला छकुली कुणी म्हणत पिंगी
कुणाची ती झाली मनु तर कुणाची टिंगी |

ओठांचा  करून चंबू काही-बाही बोलते
तिची भाषा फ़क्त तिच्या बाप्पालाच कळते |

रांगत रांगत घेतलाय तिने घराचा या ताबा
वाट बघतोय कधी मला म्हणते ती बाबा |

- विशाल पाठक

माझी मायं…

हंबरून वासराले चाटती जवा गायं
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी मायं…दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले………..

आया बाया सांगत व्हत्या,व्हतो जवा तान्हा
दुस्काळात मायेच्या माझे आटला व्हता पान्हा
पीठामंदी…..पीठामंदी
पीठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय..
तवा मले पीठामंदी दिसती माझी मायं….दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले………..

कण्या काट्या वेचायला मायं जाई रानी
पायात नसे वाहन तिच्या,फिरे अनवाणी
काट्याकुट्या…रं काट्याकुट्या
काट्याकुट्यालाही तिचं मानत नसे पायं
तवा मले काट्यामंदी दिसती माझी मायं… दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले………..

बाप माझा रोज लावी,मायेच्या मागं टूमनं
बास झालं शिक्षाण आता,होऊदे हाती कामं
आगं शिकूनं शानं…गं शिकूनं शानं
शिकूनं शानं कुठं मोठा मास्तर व्हणार हायं
तवा मले मास्तरमंदी दिसती माझी मायं….दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले………..

दारू पिऊन मायेला मारी जवा माझा बापं
थरथर कापे ती अन् लागे तिले धापं
कसा ह्याच्या…रं कसा ह्याच्या
कसा ह्याच्या दावणीला बांधली जशी गायं
तवा मले गायीमंदी दिसती माझी मायं….दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले………..

नं बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी
सांग म्हणे राजा तुझी कवा दिसलं राणी
नं भरल्या डोळ्यान…नं भरल्या डोळ्यान
भरल्या डोळ्यान कवा पाहील दुधावरची सायं
तवा मले सायीमंदी दिसती माझी मायं…दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले……

गो म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी
पुन्हा एकदा जनम घ्यावा गं माये तुझ्या पोटी
तुझ्या चरणी…गं तुझ्या चरणी
तुझ्या चरणी ठेऊन माथा धरावं तुझं पायं
तवा मले पायामंदी दिसती माझी मायं…दिसती माझी मायं

रे हंबरून वासरले चाटती जवा गायं
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी मायं…दिसती माझी मायं..

- नारायण सुर्वे

ता.क. एका सुंदर हिंदी कवितेचा 'कवी नारायण सुर्वे' यानी केलेला अतिशय सुंदर मराठी भावविष्कार (भावनिक अनुवाद).

बुधवार, १० मार्च, २०१०

अखेर कमाई

मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.

ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ्यांचा.

आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.

माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

- कुसुमाग्रज

शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१०

कविता बायकोची

बायको एकदा  जरा  जास्तच तोर्यात आली,
म्हटली करा माझ्यावर कविता अन व्हा तुम्ही सुद्धा कवी
मी म्हटल,
अग कविता करण का एवढ सोप असत,
माझ्यासारख्या सामान्य माणसाचं का ते काम असत
त्याच्यासाठी वाचन हव, शब्द-संपदा हवी,
नावाला का असेना पण उपजत प्रतिभा हवी
काहीतरीच ह तुमच,
बायकोवर कविता करायला कसली हो प्रतिभा लागते,
त्यासाठी फ़क्त बायकोवर प्रेम हवे अन संसारात गोडी असावी लागते
हट्टी ला लावा गट्टी खुळी ला जोड़ा कळी,
संसारासाठी वापरा विशेषण खेळी-मेळी
चन्द्र-सूर्य वापरा तोडून आणण्यासाठी
अन शेवटी लिहा,
स्वर्गातुनच जुळतात ह्या साताजन्माच्या गाठी
बायकोनेच जिन्नस गोला करून दिल्याने माझा काही इलाज नव्हता,
बायकोवर कविता शिजवणे हाच सुटकेचा सोप्पा मार्ग होता
आता खुळी ला कळी अन हट्टी ला गट्टी जोडतोय,
बायकोवर कविता करून मी सुद्धा कवी होतोय.

- विशाल पाठक